व्हायचे आहे का अश्वत्थामा ?
आत्तापर्यंत कडेवर बसून फुलपाखरे व पक्षी बघून खुष होऊन टाळ्या पिटणारी आमची नात मंदिरापाशी खाली उतरते . मंदिर तळ्यात आहे. सगुणा बागेतील ह्या तळ्यात नदीतील माशांना ब्रीडिंग साठी संरक्षित जागा उपलब्ध करून दिली आहे. देवाच्या दर्शनाला पाण्यातून जावे लागते. पाण्यात पॅन्ट गुडघ्यापर्यंत वर खेचून खाली वाकून, बसून तिचे निरीक्षण सुरू होते. एकाएकी दिसू लागणारे लहान मासे पाहून खुश होते. मे महिन्यात एवढे मासे दिसत नाहीत तळ्यात. "आज्जी , कित्ती मासे आहेत ! शाळेत चालले बघ !" मोठ्ठले डोळे विस्फारून ते कौतुक पहात रहाते. दोन महिन्यांनी, पायापाशी घुटमळणारे माशांचे थवे दिसेनासे होतात. " आssहो आबा , आज मासे कुठे गेले ? " "आज कुणीच नाही आले ?" हिरमुसली होऊन तिची नजर पाण्यातील पोहणाऱ्या मित्रांना शोधू लागते. मी, "का हो? कुठे गुडप झाले माशांचे थवे? आणि आताशा मासे कमी मिळतात असे नदीवर *रात्रीच्या भाजीला * जाळे घेऊन जाणारे लोक म्हणत होते . खरे का ?" शेखर , "अग, वळघणीत माश्यांनी पिल्ले दिली. ती दोन महिन्यात वाढली . सध्या उत्तरा नक्षत्र आहे आणि का...