दरवळला परिमळ सारा

खरंतर फार वाजले नव्हते. पण सूर्य कलला होता. काळोख दाटू लागला होता. पक्ष्यांचा आपल्या 
घरट्यांकडे परतीचा प्रवास सुरु झाला होता.   संध्याकाळी उशिरा  नदीवरून घाईने परतताना घराजवळ

अचानक पावलं थबकली.
 
आसमंतात सर्वदूर मंद, मोहक, सुगंधाची पखरण झाली होती. गुलाब, जाई, जुई, मोगरा, सोनटक्का, चाफा, बूच, बकुळ  ह्यांपेक्षा वेगळा, अलवार सुगंध ……

मन घरी ओढ घेत होतं, पण पाय मात्र जागचे हलायला तयार नव्हते ह्या लपलेल्या सुवसाला कुठे शोधू असं होऊन गेलं.

आजी ssss
आजीssssss ग! 
थांबायचे का आपल्याला 'पपम' जवळ?

पपम..... पपनसाचे नाव आभाने काढल्याबरोबर सुगंधाचे कोडे उलगडले. झाड दिसत नव्हते पण सुगंध आपली ओळख सांगत होता.

पपनस फुलावर आलाय वाटतं!!!

हिवाळ्याचे उत्तरार्धात वातावरण थंड पण कोरडे असते. यावेळी पपनस फुलतात..... हो तेच ते फळ जे  गणपती घरी आले की वाट्टेल ती किंमत देऊन बाप्पासाठी घेऊन येतो.
हे झाड मूळचे मलेशियातील. भारतात चांगले रुळले. चुरल्यावर प्रसन्न सुगंध येणारी गर्द हिरवी गोल मोठी पाने... . पांढऱ्या रंगाचे, मंद सुगंधी फुलांचे घोस फांद्यांच्या टोकाशी लगडलेले. 

पपनस हे लिंबूवर्गीय फळ. चांगले पोसलेले तयार फळ एक किलोपर्यंत होते. चव गोडसर आंबट अशी. फळात बिया कमी पण आकाराने मोठ्या. ह्या पौष्टिक फळांच्या सेवनाने वजन कमी होते असे म्हणतात.

फुलांची उत्पत्तीच मुळी पुनरुत्पादनासाठी असते. किटकांना आकर्षित करण्याच्या कौशल्यावर त्यांच्या प्रजातीचे भविष्य अवलंबून असते.

सुगंधी फुले सहसा पांढरी असतात आणि . सूर्यास्तानंतर फुलतात. चंद्र प्रकाशात चांदण्यांसारखी उठून दिसतात. रात्री सक्रिय होणाऱ्या कीटकांना साद घालण्यासाठी ह्या फुलांतील  सुगंधांना  पंख फुटतात.

लिंबू , संत्र, मोसंबीच्या, एवढाच नाही तर आत्ता फुललेल्या करवंदाच्या फुलांचा सुद्धा सुवास भरभरून घेऊन  हरवून जायला होतं स्वतःला.

व्हिएतनामच्ची राजधानी हॅनोई येथे फेब्रुवारी मार्च दरम्यान पपनसाच्या ताज्या फुलांचे मंद सुगंधी गुच्छ लहान लहान टोपल्यांमध्ये विक्रीसाठी येतात. 
ह्यापासून खुषबुदार परफ्यूमस् व तेल तयार करतात. 

फुलांच्या गुच्छा  पैकी एक किंवा दोन फुलांना फळे धरतात. बाकी सगळ्यांचे दुसऱ्या दिवशी निर्माल्य होते. 

रात्री सुगंधाचे याआणि अनुपम शुभ्र सौंदर्याचे अलंकार अंगोपांगी ल्यायलेल्या फुलोऱ्यात कुठे कर्तृत्वाचा अहंकार नाही की भोक्तृत्वाची  आस ही नाही. अक्षरशः फळाची अपेक्षा न धरता केलेलं सुबक कर्मच ते. 

तो वरचा बाप्पा किती किती रूपांनी प्रगटतो…! त्याच्या दर्शनाच्या अनुभूतीची कला अवगत झाली तर ……………..आणखी काय हवे ?

अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
anu.bhadsavle@gmail.com

Comments

Popular posts from this blog

मदनबाण

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1