आठव..आईचा

माझी, संजीव व  धनंजयची आई, 
श्रीम. रोहिणी रमाकांत बेंद्रे आज  87 वर्षांची झाली असती.
सतत हसतमुख, बेताची उंची, लख्ख गोरा रंग, मध्यम अंगकाठी , कोणत्याही कामात पुढाकार घेणारी, आपली मते परखडपणे मांडणारी,शाळेतील मुलांना व मैत्रिणींना घेऊन दूरदूर प्रवास करणारी....चुकल्यावर रागावणारी....
लहानपणापासूनची तिची खूप रूपं आठवत राहतात. 

आमची आई साक्षोपाने सगळे सण साजरे करायची. होळी, गुढीपाडवा,  अक्षयतृतीय, श्रावणी शुक्रवारचे हळदी कुंकू, नारळीपौर्णिमा - कोजागिरी पौर्णिमा, पोळा, गणपती,  नवरात्र दिवाळी, दसरा, संक्रांतीचे हळदीकुंकू....सगळं कसं , गणगोतांच्या गराड्यात पक्वान्नांसह, नीटनेटके कपडे लेवून साग्रसंगीत... व्हायलाच हव…

“त्याशिवाय तुम्हाला कळणार कसे आपले सण?”

 लग्नाला कुणाकडे जाताना नवीन, टोचणारे कपडे घालायचा मला नेहमी कंटाळा यायचा.
 “  ‘आपण येऊन आमच्या कार्यक्रमास शोभा आणावी’ असे लिहिलेले असते ना पत्रिकेत? मग  त्यांच्या समारंभासाठी आपण चांगले नीट कपडे नको का घालायला?"
ह्या बिनतोड प्रश्नावर काय उत्तर देणार?

पहाटे चार ते रात्री अकरा...सतत कामात व्यग्र असणारी..आई कधी झोपते? असा प्रश्न पडायचा.

संध्याकाळी हात-पाय धुवून शुभंकरोती, राम रक्षा, पाढे झाल्याशिवाय जेवायला मिळायचं नाही.

एकत्र कुटुंबात तीन सासवा, आमचे काका, आत्या, पाहुणे रावळे , मित्र मंडळ, आम्ही 3 लहान मुले, स्वतःची व बाबूजींची नोकरी .....कसं केलं असेल तिने सगळं हसतमुखाने?

लग्नानंतर BA, MA , B Ed केल. साठच्या दशकात तिने शाळेच्या मुलांसाठी विमानाची ट्रीप काढली. विद्यार्थीप्रिय उत्तम शिक्षक होती.उरण येथे मुख्याध्यापक असताना प्रशासनात कौशल्य व सर्वांगीण शिस्तीच्या बाबतीतील दक्षतेने तिने शाळेला विशेष उंची प्राप्त करून दिली. 

‘सातच्या आत घरात’ अशी कडक शिस्त होती आमच्या घरी. ती मोडण्याची हिम्मत मी तरी कधी केली नाही. जाणती झाल्यावर, माझ्या मित्र मैत्रिणी विषयी तिला कधी अडचण वाटली नाही. परंतु मैत्री कुणाशी किती आहे याकडे तिची बारीक नजर असायची.

शिवणकाम, विणकाम, भरतकाम . क्रोशा, स्वयंपाक,या कलांमधील प्राविण्य तसेच माणुसकी आणि शेजारधर्म पाळण्याचे संस्कार तिला तिची आई इंदिराबाई कारखानीसांकडून मिळाले असले पाहिजेत. 

 तेलपोळ्या,  कानोले, मोदक, निरनिराळे मसाले , कोथींबीरीच्या वड्या, केक,  अनेक प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ तिनेच करावेत. 

तिला पाहुणे आणि पाहुणचार मनापासून  आवडायचा. 25- 50 पाहुण्यांचा स्वयंपाक ती एकटी करायची आणि नंतर कार्यक्रमात हसतमुखाने सहभागी व्हायची. 

आमच्या वडिलांना,  बाबूजींना मुंबई एअरपोर्टवर एक्ससाईज ड्युटी लागताच तेथील प्रलोभनांपासून दूर राहण्यासाठी बदली करून घेण्याचा आग्रह तिने धरला. बाबूजींनी तो मानलाही.

आईने मला आयुष्यामध्ये चार नियम स्वतःच्या वागणुकीतून घालून दिले.

1. सतत देत रहावं . दिल्याने वाढतं.... लहानपणी हे कळत नसे पण जसे हे तत्व वापरत गेले तसा प्रत्यय येत गेला. 

2. मला जी गोष्ट नको ती दुसऱ्याला भेट  कधीच द्यायची नाही. मला जे आवडते, हवेसे वाटते त्याचीच भेट द्यायची...ही विचारधारा मी कसोशीने पाळली. 

3. हातासरशी काम उरकणे
आपलं काम आपणच  पूर्ण करावं. दुसऱ्या कुणाला  त्यावर हात फिरवयायला लागू नये.  
विशेषतः स्वयंपाकाचा ओटा असा चकचकीत करावा ती पुनः तिथे काम करायला उत्साह वाटावा.

4. आपलं काम इतके देखणे आणि नेटके असावे  की दुसऱ्याने त्याच्याकडे वळून वळून बघावे .. 

आयुष्याच्या उत्तरार्धात ती कविता करत असे. घरातील , ओळखीतील प्रत्येकासाठी त्यांचे नेमके  वर्णन करणाऱ्या व कधी चिमटे काढणाऱ्या कविता तिने केल्या.

अनेक घरांशी, संस्थांशी तिचे स्नेहबंध जुळले. योग विद्या धाम नाशिक यांच्या यांच्याशी तिचा विशेष स्नेह होता.

प्रपंचासाठी तिला खूप कष्ट करावे लागले. पण त्याची खंत कधी केली नाही. उलट मनापासून केलेल्या कामातून कौशल्य मिळते. ह्या फायद्यांकडे  लक्ष दिले की त्रास होत नाही अशी सकारात्मक मतं तिची होती.

मुले - सुना लेक - जावई , नातवंडे, पतवंडे, कमलताई सहस्त्रबुद्धे, कर्णीकबाई  यांच्यासारख्या खास मैत्रिणींची मैत्री तिला लाभली.

समृद्ध, परिपूर्ण आयुष्य व बाबूजींसारखा देखणा, प्रेमळ, दिलदार व कडक शिस्तीचा भोक्ता असा  उत्तम सहचर तिला लाभला.

माणूस जातो म्हणजे पारच निघून जातो नाही? ना पुसटसा स्पर्श करतायेत ना आवाज ऐकता येत…!
आठवणी राहतात.

आरशात पाहताना माझ्यात कधीतरी तिचा भास होतो... माझ्याच वागण्यात कधीकधी तिचं प्रतिबिंब मला दिसतं.

खरे तर ही अशीच  कहाणी थोड्या फार फरकाने माझ्या सासूबाईंची सुद्धा आहे. त्यांचा सहवास मला जास्त लाभला. वहिनीनी मला माझ्या आईची उणीव कधी भासू दिली नाही. 

सर्कल ऑफ लाइफ म्हणजे काय त्यात उमजू लागले आहे असं वाटतं.

आई,  जीवनाच्या अप्रतिम देणगी बद्दल धन्यवाद!

Comments