वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1
आज, लौकरच " झोप पुरी झालेल्या " नाती बरोबर मंदिरात निघाले.
मंदिर कमळांच्या तलावात आहे. धुक्यात लपेटलेल्या काचेमधून दत्त महाराजांचे नेहमी सारखे दुरूनच दर्शन झाले नाही.
“ आज्जी, आज बाप्पा कुठे लपून बसलाय ?” व लगेच …
“अबब ! केवढी ही कमळं !”
नातीच्या निरीक्षणांनी , भगवंताच्या दर्शनासाठी आलेली मी सुद्धा कमळांच्या ताटव्यात हरवून गेले. पहाता पहाता सूर्याची कोवळी किरणे फुलांवर पडू लागली आणि,
आमच्या नजरे समोर गुलाबी , पांढऱ्या कमळांना जाग आली. कळे उमलू लागले.
ते विलक्षण सुगंधी, क्षण वेचताना प्रश्न आला ,
" आजी, हा काळा किडा कमळात काय करतोय?”
तिच्या प्रश्नांचा हा भुंगा मला पार मेघदूतात घेऊन गेला.
महाकवी कालिदास सांगतात
यक्ष हे कुबेराचे सेवक. हिमालय हा त्यांचा निवास. अशाच एका यक्षाला कुबेराने शंकराच्या पूजेसाठी सूर्योदयापूर्वी हजार कमळं आणून देण्याची जबाबदारी दिलेली असते. आधीच हिमालय ,त्यात पहाटेची वेळ आणि त्यात या यक्षाचं नवीन लग्न झालेलं. त्याला ह्या कामाचे ओझे वाटू लागले .
त्या रसिक यक्षाला लक्षात येतं ,
‘ अरे, आपण फुलं पहाटे काढतो, तेव्हा ती फुललेली नसतातच मुळी . मग रात्रीच मिटलेल्या कळ्या काढल्या म्हणून कुठे बिघडलं?’ प्रमादाची कार्यवाही होते.
सकाळी कुबेर पूजेला बसतो. शेवटचं कमळ देवाला अर्पण करायला आणि ते उमलायला एकच गाठ पडते. त्या कमळातून एक भुंगा बाहेर पडतो.
यक्षाची लबाडी कुबेराच्या लक्षात येते.
तो संतापतो आणि सरळ एक वर्ष प्रिय पत्नीचा विरह सोसावा लागेल असा शाप देऊन मोकळा होतो.
'भुंगा खरेच अडकून पडतो की काय रात्री कमळात?'
ह्या प्रश्नाचा शोध घेताना फार मजेशीर शास्त्रीय सत्य समोरं आलं.
कमळ ही वनस्पती आपली फुले थंड हवामानातही उबदार राखते. 10 अंश सें. हवामानातही फुलाचे तापमान
29 ते 32 डिग्री सें. राखले जाते . भुंगे, भुंगेरे हे थंड रक्ताचे कीटक. बाहेरील तापमाना प्रमाणे शरीराचे तापमान बदलणारे.
हे कीटक रात्री फुलांमध्ये वस्ती करतात . परागकणांची शाल पांघरुन झोपी जातात. सूर्योदयी कमळाची कळी उमलताच फुललेल्या फुलांकडे झेपावतात. कमळ वनस्पतीचे परागीभवनाचे काम होते व कीटकांना थंडीत उब मिळते.
कमळाच्या फुलात रात्री भुंगा अडकणे ही कविकल्पना नसून शास्त्रीय सत्य आहे.
अनुराधा चंद्रशेखर भडसावळे
anu.bhadsavle@gmail.com
Comments