मदनबाण
मदनबाण
साडेपाच वाजताही थोडे उजाडले असते मे महिन्यात. अंगणात पाऊल टाकायच्या आधीच मदनबाणाचा अनुपम सुगंध मन प्रफुल्लित करून टाकतो. अंगणातल्या बागेत मदनबाणाची लहान झाडे लावलेली आहेत. ती लहान झुडुपे आता कळ्यांनी आणि फुलांनी डवरली आहेत. भर उन्हाळ्यात, अंगाची काहिली होत असताना आपल्या शुभ्र फुलांनी आणि मोहक सुगंधाने दिवस उल्लासीत करणारा मोगरा व त्याचाच चुलत भाऊ मदनबाण सध्या भाव खाऊन जात आहेत. …!
मदनबाण............ कुणी दिलंय हे समर्पक नाव? कोण मदन? तो फुलांचा बाण वापरतो?.
मदन म्हणजेच कामदेव.
कामदेवाचे धनुष्य व बाण दोन्ही पुष्पमय आहेत. रक्तकमल, नीलकमल, आम्रमंजरी, अशोकपुष्प व मोगरा ही पाच पुष्पे त्याचे पाच बाण आहेत व त्याचे धनुष्य उसाचे आहे.युवा मनात प्रेम भावना रुजविण्यासाठी मदनाकडून ह्या पंचबाणांचा उपयोग केला जातो. शुक हे त्याचे वाहन आहे . दक्षाची अत्यंत रूपवती कन्या रति त्याची पत्नी आहे असे वर्णन आहे.
भगवान शंकर, सतीच्या दक्षयज्ञातील मृत्यूने विरक्त झाले. समाधिस्थ झाले. त्याला युगानुयुगे लोटली .
इथे पृथ्वीवर तारकासुर जरा मरणाची भीती नसल्याने अजिंक्य होता. उन्मत्त झाला होता. त्याने तिन्ही लोक पादाक्रांत केले होते. त्याचा मृत्यू शिवांच्या पुत्रा हाती होता. त्यासाठी त्यांची समाधी भंग पावायला हवी होती. शीघ्रकोपी शिव शंकरांचा तपोभंग करण्याचे अवघड काम इंद्रदेवाने मदनाला दिले.
मदनाने जगाच्या कल्याणासाठी हे काम स्वीकारले.
शिव शंकर समाधिस्थ असलेल्या वनात मदन ससैन्य अवतरला. वसंत ऋतू प्रगटला. तरुवर फुलांनी डवरले. कमळे फुलली. आंबे मोहरले. भुंगे गुंजारव करू लागले. कोकीळांचे कू ssssss हू , कू ssssss हू कूजन सुरु झाले. मंद, शीतल सुगंधित वारे वाहू लागले. अप्सरांच्या नृत्य गायनाने वातवरण कुंद ...धुंद झाले.
परंतु महादेव अविचल राहिले. सर्व तयारीनिशी आलेल्या मदनाचा सपशेल पराभव झाला..
मन्मथ मनस्वी संतापला. आवेशाने आंब्याच्या वृक्षावर चढला. धनुष्यावर बाण चढवला. मदनाच्या बाणाने शिवाच्या हृदयाचा वेध घेतला. समाधी भंग पावली.
प्रभू प्रक्षुब्द्व झाले. आंब्यात लपलेला मदन त्रिलोचन महेशच्या तृतीय नेत्राच्या तेजात जळून खाक झाला. मदन दग्ध झाला.
मदनाची पत्नी रति, आक्रोश करीत, करूणा भाकीत भगवान शंकराकडे गेली. परोपरीने त्यांना विनवले. ….
“ परोपकारासाठी, तारकासुराच्या मृत्यूसाठी देवेंद्रच्या आज्ञेचे मदनाने पालन केले. ही भीषण शिक्षा त्यांना व मला का?”.....मदन पत्नी रति
“ तुझ्या पतीचे नाव आतापासून अनंग असेल. देहाशिवायच तो हे सर्व जग व्यापेल. कृष्णावतारात त्याचा पुत्र म्हणून मदन जन्म घेईल. तेव्हाच तुझी त्याची भेट होईल.” ......भ. शंकर.
भ. शंकरांचा विवाह हिमालयाची कन्या उमेशी झाला. त्यांचा पुत्र षडानन कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला.
तर … सर्वांना आपल्या मनमोहक सुगंधाने विद्ध करणाऱ्या मदनाच्या मदनबाणाची ही कथा!
खरे तर मोगरा, मदनबाण, जाई, जुई, चमेली यांच्या सुगंधाने होणारा आनंद हा आपल्याच आनंदाचे प्रतिबिंब आहे ना ?
सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
Comments