जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!



पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, तलाव, सरोवरे फार छान दिसतात. त्यातच  कधी पूर येतो व पाण्याची सरमिसळ होते.

           पावासाने  काढता पाय घेतला आणि हवामान उष्ण व्हायला  लागले की जलसाठ्यातील पाणी कमी होत जाते. नीट निरीक्षण केले तर आसपासच्या  जलाशयांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात लहानसा हिरवा पुंजका तरंगताना दिसतो. महिन्याभरात वरील ठिकाणी फिरायला जावे, तर पाण्यावर  पसरलेला गच्च , गर्द हिरवा गालिचा पाहून धक्का बसून थक्क व्हायला होते.

एवढ्या झपाट्याने वाढणारी ही  काय वनस्पती असावी?

ही आहे जलपर्णी

जलपर्णीचे इंग्रजी नाव आहे  Water hyacinth
 ( Eichhornia crassipes )

 जगभरातील अगणित  जलाशयांत, जलस्रोतांमध्ये  ह्या वनस्पतीने अतिक्रमण केले आहे. जलपर्णीच्या बेलगाम वाढीने  प्रगत देशांनाही त्राही भगवान करून सोडले आहे.

              लहान मोठ्या जलाशयांवर दाट हिरवे  जाजम पसरल्यासारखी तरंगणारी जलपर्णी प्रथमदर्शनी फार छान दिसते.  गर्द हिरवी चकचकित गोलसर तुकतुकीत पाने, मध्यभागी उंच पुष्प दंडावर दिमाखाने मिरवणारी, पिवळा ठिपका ल्यालेली निळी फुले .....

परंतु सावधान!

महाभारतातील बाल कृष्णाला मारायला आलेली  पुतना मावशी किंवा रामायणातील सुंदर रूप घेऊन आलेली शूर्पणखा ह्यांच्यात व देखण्या जलपर्णीच्या
*विष स्वरूपात*  काहीही फरक नाही. कारण ह्या देखण्या जलपर्णीच्या प्रादुर्भावाने मोठमोठे जलाशय मृत होतात.

      रामायणातील, स्वतःच्या रक्ताच्या थेंबाथेंबा पासून पुन्हा पुन्हा उत्पन्न होणाऱ्या अहिरावण महिरावण कथेतल्या प्रमाणे...

जलपर्णी वनस्पती तिच्या प्रत्येक तुकड्यापासून  नवीन कार्पेट निर्माण करू शकते. पाच दिवसात दुप्पट ह्या प्रचंड गतीने तिची वाढ होते. प्रत्येक झाड हजारो बिया एका पैदासकाळात निर्माण करतात. बियांची जिवंत टिकून राहण्याची क्षमता 28 वर्षे पर्यंत असते.

उपद्रवमूल्य :

1.जलपर्णीमुळे  पाण्याचा प्रवाह खुंटतो.
2.अर्थातच त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते.
3. पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सीजन न पोचल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात येते.
4. डास आणि गोगलगाय यांची बाकी उत्तम पैदास होते.
5. पाण्याची गुणवत्ता खराब होते आणि पाणी रोगट दिसू लागते. पाणी पुढे पुढे मृत होते.
6.शेतीसाठी किंवा घरात वापरायला पाणी उपलब्ध नसते.

जलपर्णी ही प्रदूषण निदर्शक ( Indicator ) वनस्पती आहे.

प्रदूषित जलाशयांमध्ये ही  वनस्पती घुसखोरी करते व तेथून काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही त्याला ती जुमानीत नाही. आपल्या आजूबाजूचे जलाशय ह्या विधानाच्या सत्यत्वाची ग्वाही देतील.

        जलाशय प्रदूषित करायला सुरवात केल्या पासून काही महिने अथवा वर्षांत जलपर्णी तेथे आपले बस्तान बसवते.  पुराबरोबर वाहत आलेला एखादा तुकडा चहू अंगांनी पसरू लागतो आणि बोल बोल म्हणता पाण्याचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापून टाकतो.

नद्यांच्या पाण्यात नागरी वस्त्यांमधील अशुद्ध पाणी व कारखान्यांचे रासायनिक प्रदूषकांची विल्हेवाट लावली जाते हे सत्य आहे. जलपर्णीच्या बेबंद वाढीचे हेच कारण आहे.

सांडपाण्यामधील  सेंद्रिय पदार्थात  नायट्रोजन, व डिटर्जेण्ट इ. मध्ये  फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. यांच्यामुळे जलपर्णीच्या वाढीला उत्तम वेग मिळतो. २५ ते ३५  डिग्री सेल्सिअस मध्ये उगवण व वाढ झपाट्याने होते.
        उष्ण  हवामान व धनदांडग्यांच्या मनमानीमुळे  प्रदूषित झालेले जलस्रोत असा संगम जलपर्णीच्या वाढीसाठी पर्वणीच ठरतो. नदी, नाले, तलावांमध्ये प्रदूषके सोडणे थांबवणे हा खरा उत्तम मार्ग हा विखारी विळखा सोडविण्याचा.

जलपर्णीच्या समस्येची  व्याप्ती जगभर आहे.

        ह्या पाणी  समस्येचा सखोल अभ्यास प्रयोगशील शास्त्रज्ञ शेतकरी श्री चंद्रशेखर भडसावळे यांनी केला. व त्यावर उपायही शोधला.

            औरंगाबाद येथील प्रसिद्ध सलीम अली  सरोवराला जलपर्णीने विळखा घातला होता. ह्या एकेकाळी जैव विविधतेने नटलेल्या  चाळीस एकर तलावाला जलपर्णी मुक्त करण्याची किमया शासनाच्या व स्थनिकांच्या मदतीने ,( SJT) सगुणा जलसंवर्धन  तंत्राने त्यांनी करून दाखवली.

            ह्या गोष्टीचा गाजावाजा होताच नेरळ जवळील उकरूळ गावातील ग्रामपंचायतीने मा. सरपंच सौ.वंदना थोरवे ,सदस्य श्रीयुत योगेश थोरवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गावातील तलाव साफ करण्यासाठी उचल घेतली.

21 डिसेंबर 2019 रोजी दोन एकर क्षेत्रफळाचा तलाव  SJT तंत्राने साफ करण्यास टीमने सुरुवात केली.
आज 21 जानेवारी 2020 रोजी तलाव जलपर्णी मुक्त झाला आहे.

SJT तंत्रामध्ये तणनाशकाच्या साह्याने जलपर्णी ची ताकद कमी केली जाते.  नंतर तिचे तरंगणारे मोठाले तुकडे यंत्राच्या सहाय्याने बाहेर काढून टाकले जातात. बाहेर काढलेल्या मृत वनस्पतीचे खत तयार केले जाते.
तलावातून जलपर्णी काढल्यावर खालील पाणी काळ्या रंगाचे व दुर्गंधीयुक्त असते.

एकदा का जलपर्णीचा प्रादुर्भाव झाला की तिचा निप्पात करणे जवळजवळ अशक्य असते. परंतु,...

SJT तंत्राचा वापर करून , शासन, स्थनिक संवेदनशील जागरूक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी जलाशय जलपर्णी मुक्त करणे शक्य आहे. संबंधितांनी  सतत जागरूकतेने लक्ष दिल्यास असे स्वच्छ केलेले तलाव पुन्हा पूर्ववत चांगले होतात असा टीम SJT चा अनुभव आहे.

आत्ता पर्यंत जलपर्णी समूळ नष्ट करण्याचा जगभर अनेकवेळा, करोडो डॉलर खर्च करून प्रयत्न झाले. परंतु त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही.
SJT हे एकमेव असे तंत्र आहे की जे कमी  खर्चात, कमी वेळात अत्यंत प्रभावी ठरले आहे.

सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे
anu.bhadsavle@gmail.com

Comments

Popular posts from this blog

मदनबाण

सुख आणि सौख्य