सुख आणि सौख्य
माझी चिमुरडी नात आहे दोन वर्षांची . फार गोड आहे. तिला लपाछपी, पकडपकडी खेळायची असते. पुस्तकातील चित्रे जाणून घ्यायची असतात. वही पेन घेऊन अभ्यास करायचा असतो.
देवाची पूजाही बरोबरीने करायची असते. जमिनीवर बसले असता पाठीमागून तिची बाळमिठी गळ्याला बसली की मन आनंदाने भरून येते.
सुख सुख म्हणतात ते म्हणजे हेच असं वाटत असतानाच..…...आई, बाबा, आबा पैकी कुणी बाहेर निघाले की हिची मिठी लगेच सुटते.
" मना पन ने ना। मना यायचंय " म्हणत आपले बूट शोधू लागते.
क्षणा पूर्वी सुखसागरात विहार करणारे मन म्हणू लागले...........
जागी हो बाई , जागी हो .
लक्षात आलं की हा अनुभव फक्त माझा नाहीय. तीन चार महिन्यांच्या बाळालाही आईच्या उबदार कुशीतूनही " भुर्रर्रर्र "
ची ओढ असतेच.
आपले सुखाचे स्वरूप बदलतेच राहते!
समर्थ निक्षून सांगताहेत.....
विषय जनीत सुखे सौख्य होणार नाही.
काय आहे सुख ?
शब्द स्पर्शादी विषयां पासून तात्पुरते मिळालेले ते सुख . पण त्याच्या भ्रमंतीत शीण आहे.
सौख्य ... विषयांशिवाय माझ्यातच मला सापडलेले कायमचे सुख, आनंद, ते सौख्य !!!!
सौख्य टिकाऊ असते म्हणूनच आशीर्वाद दिला जातो......
" नांदा सौख्य भरे तुम्ही वधू वरे "
अनुराधा भडसावळे
Comments