चार मित्र व परिपूर्ण पर्यावरण

भूतान, हिमालयाच्या कुशीत वसलेला एक आनंदी देश .जंगल संपत्तीच्या ऐश्वर्याने संपन्न असलेला जगातील एकमेव कार्बन निगेटिव्ह देश. तिथल्या निसर्गस्नेही संस्कृतीशी घट्ट नाते असलेली ही प्रख्यात लोककथा.

ससा, माकड, हत्ती व एक पिटुकला पक्षी हे त्या जंगलातील जिवाभावाचे चार मित्र. एक दिवस त्यातील पक्ष्याने सफरचंदाच्या झाडाचे बी आणले. ते जमिनीत लावले. हे पाहून त्याचा मित्र ससा म्हणाला
“ ह्या कामात तुला मी काय मदत करू?”
“तू आत्ता ह्या बियाला व नंतर येणाऱ्या रोपाला पाणी दे”
वानर म्हणाले, “मी काय करू रे”
“ तू ह्या झाडाला पाहिजे तेव्हा पुरेसे खत घाल”
तेवढ्यात त्यांचा चौथा दोस्त हत्ती आला.
“शक्तिमान मित्रा तू झाडाचे संरक्षण करशील का? तर सर्वांना रसाळ फळे मिळतील.”
हत्तीने झाडाच्या सरक्षणाची जबाबदारी घेतली. चौघांनी कामे वाटून घेतली व पूर्णही केली.

एवढी काळजी घेतल्यावर वर्षागणिक ते सफरचंदाचे झाड मग सरसर, झपाझप वाढू लागले. उंच झाले. त्याला लालभडक रसाळ फळे येऊ लागली. परंतु फळे खूप उंचावर असल्याने खाण्यासाठी काही मिळेनात.

त्यां मित्रांनी मग एक युक्ती केली. हत्तीच्या पाठीवर माकड चढले. माकडाच्या खांद्यावर ससा उभा राहिला आणि सशाच्या पाठीवर पक्षी.
पक्ष्याने सर्वांना पुरेशी पिकलेली फळे खाली टाकली. सगळ्यांनी मिळून गोड फळे मनसोक्त खाल्ली.

झाड लावले व मोठे केले चारही मित्रांनी. एकजुटीने, सामंजस्याने, सहकार्याने. कुणी झाडाच्या मालकीसाठी भांडले नाहीत. हत्तीने झाड गदागदा हलवून खिळखिळे केले नाही. माकडाने पाने, अथवा कच्ची फळे चावून टाकून नासधूस करण्याचा नतद्रष्टपणा केला नाही. सशाने बीळे करताना मुळांना धक्का लावला नाही. पक्ष्याने परागीभवन करणाऱ्या कीटकांना मटकावून टाकण्याचा अप्पलपोटेपणा केला नाही.

सर्वांनी मिळून राखलेल्या झाडाची पिकलेली फळे परस्परांना मदत करून काढली व एकमेकांच्या अनुमतीने, सलोख्याने वाटून घेऊन आनंदाने खाल्ली. ते आनंदी झाले. सभोवतालही खुलून गेले.

निसर्गात प्राणी, वनस्पतींमध्ये सुंदर सहजीवन असते. देवाण घेवाण असते. वनस्पती अन्न व प्राणवायू देतात. प्राणी खत देतात. परागीभवन, बीज प्रसारण करतात. कीटकांनी फुलातून मध घेतले तरी ते परागिकरणाचे काम बेमालूम करतात.

वनस्पतींवरच शाकाहारी प्राणी जगतात, वाढतात. शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राण्यांचे भक्ष्य बनतात. लहान मांसाहारी प्राण्यास मोठा प्राणी गट्टम करतो. निसर्गात सगळं कसं बिनबोभाट चाललेलं असतं.

माणूसही निसर्गाचा एक घटक आहे.
तो निसर्गा शिवाय जगूच शकत नाही. निसर्गातुन त्याला सतत काही न काही हवे असते. ते तो हक्काने, मुजोरपणे घेतोही. पण मात्र त्या बदल्यात निसर्गाला तो काय देतो?

हवेतून ऑक्सिजन घेऊन तिथे धूर, विषारी वायू सोडतो. अन्न पुरवणाऱ्या जमिनीत रासायनिक खते घालून ती नापीक करतो. सुंदर नदी नाल्यांमध्ये सांडपाणी, कारखान्यांची विषारी रसायने सोडतो. समुद्रात सुद्धा प्लस्टीक, इ. चे प्रदूषण करतो. जंगले तोडतो. वणवे लावतो. डोंगर फोडतो. खाणी खणतो.नदी- समुद्र क्षेत्रात भर घालून घरे बांधतो. वाट्टेल तेवढा - विल्हेवाट लावता येणार नाही एवढा कचरा करतो.

महात्मा गांधीं म्हणतात
" निसर्ग हा माणसांच्या गरजांसाठी पुरेसा आहे परंतु हावेसाठी मात्र नाही." गरजा प्रमाणात असतील तरच निसर्ग त्या पुरवू शकतो.

माणसाने निसर्गातून आपल्याला हवे तेवढेच अलगद काढून घ्यायला हवे.

माणसाने आपल्या गरजा मर्यादशील ठेवायला हव्या. आपण आपली निसर्गसंपदा सांभाळली, वाढवली, सर्व प्रकारचे प्रदूषण कमी केले तर हवा स्वच्छ, पाणी निर्मळ व जमीन सुपीक होईल. अशा ठिकाणी अनेक पशुपक्षी हजेरी लावतील व पर्यावरण जैव विविधतेने नटून जाईल.

लोककथेतील लहानग्या पक्ष्यापासून ते शक्तिमान हत्तीला जसा फळांचा लाभ झाला तसाच आपण निसर्गाला सांभाळले, त्याला ओरबडले नाही तर आपल्यालाही समृद्ध व संपन्न पर्यावरणाचा लाभ होईल.

सौ. अनुराधा चं भडसावळे.

Comments

मकरंदकाका said…
अगदि खरे आहे. निसर्ग मर्यादित रुपातील गरजा नक्की पुऱ्या करतो, अमर्यादीत हाव नाही.

Popular posts from this blog

मदनबाण

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1