फरक पडतो.......

*अमेरिका * बहुतेकांच्या जिव्हाळ्याचा देश.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात जगप्रसिद्ध असे योसेमाईट राष्ट्रीय वन आहे. देशी विदेशी पर्यटकांना भुरळ पडणारी ही जागा आहे.

ओक, सिडार, बर्च, डॉगवूड, मेपल, रेडवूड, पाईन अशा सारख्या अनेक प्रकारच्या वृक्षांची दाट गजबजलेली वस्ती तेथे आहे. त्यामुळे जैवविविधतेने नटलेलेअतिशय समृद्ध जंगलच तयार झाले आहे. तिथे झाडांखाली फळांचा, ज्याला कोन म्हणतात, त्यांचा खच पडलेला असतो.

पर्यटनासाठी कुठे फिरायला गेलं की तिथली आठवण म्हणून काही सुवेनिअर आणले जाते.

एक पर्यटकाला योसेमिटीला गेल्यावर असं वाटले, केवढे कोन खाली पडलेत; एखादा कोन आठवण म्हणून घरी न्यावा.

...........आणि..........

त्याने खाली वाकून फळ उचलले मात्र, तेथील कर्तव्यदक्ष वनरक्षक लगेच हजर झाला !!
अदबीने परंतु जरबेने त्याने विचारले,

" हॅलो मिस्टर ! आपल्याला हा कोन आवडला का ?"

"हो तर. आमच्या कडे अशी झाडे नाहीत त्यामुळे ह्या फळाचे अप्रूप वाटले. घेतला तर चालेल ना ?"

" कसे आहे की ह्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी चार ते पाच दशलक्ष पर्यटक दरवर्षी भेट देतात. प्रत्येकाने जरी फक्त एक कोन नेला तर ह्या जंगलाचे किती नुकसान होईल?"

" ही पाने, फळे जमिनीवर पडली की कुजतात. सूक्ष्मजीव त्यांचे विघटन करतात.याचा झाडाला अन्न म्हणून उपयोग होतो.हळू हळू जमीन सुपीक बनत जाते. वन समृद्ध होत जाते"

" बिया जमिनीत रुजतात. नवीन रोपे होतात.
शिवाय ह्या बिया खारीं सारख्या अनेक प्राण्याचे अन्न आहे. "

" हे सगळे एक स्वयंपूर्ण जीवनचक्र आहे . ह्या निसर्गचक्राला  आपण धक्का लावणे गैर आहे.   क्षमा करा पण आपण येथील काहीही वस्तू उचलुन नेऊ शकत नाही"

प्राणी, वनस्पती , जमीन व माणूस ह्या सर्वांचा
एकमेकांशी पूरक व्यवहार असण्यासाठी किती जागरूक असतात हे पाश्चिमात्य लोकं!

निसर्गात पडलेली चीज मी उचलली तर काय नुकसान होणार आहे याचा कधी विचारच मनात येत नाही हेच खरे !

निसर्गभान आणणारी गोष्ट संपली.

आता आपण आपले पर्यावरणप्रेम तपासून घेऊया.
आपल्याला वाटते, माझ्या इतक्याशा लहान गोष्टीने निसर्गात काय मोठा फरक पडणार आहे?

"चालत्या गाडीतून खाऊची रिकामी पिशवी बाहेर टाकली तर काय हरकत आहे? सगळे नेहमीच तसे करतात. मी हे एकदाच केले",

"नदीवरील पुलावर मुद्दाम थांबून प्लॅटिक पिशवीतून आणलेले निर्माल्य नदीत फेकताना मुळीच अपराधी वाटत नाही. कारण खूप जण असेच करतात."

" एवढा पाऊस होतो. केवढे पाणी समुद्राला मिळते मग मी कशाला ब्रश करताना नळ बंद करू? का कमी पाण्यात भागवून घेऊ? "

कचऱ्याचे डोळ्यांना खुपणारे ढीग रस्त्याच्या दुतर्फा असताना मी का माझा कचरा इतरत्र टाकू नको?

प्लास्टिक पिशवी भाजीवाला देतोच मग मी कशाला कापडी पिशवीचे लोढणे नेऊ सोबत?

"मी टाकले अन्न ताटात म्हणून काय कुणाला कमी पडणार आहे?

"त्याने केले म्हणून मी पण केले. "
"एव्हढाशाने का फरक पडणार आहे ?"

पण फरक पडतो. आपल्या लहानशा गोष्टीनेही निसर्गावर ताण येतो. त्याचे जीवनचक्र
डळमळीत होते. पाणी, जमीन, हवा काहीही गरजेपेक्षा जास्त घेण्याचा , प्रदूषित करण्याचा मला अधिकार नाही. तेव्हा लक्षात घेऊया...

फरक पडतो.....नक्कीच फरक पडतो.

सौ अनुराधा चं भडसावळे.

Comments

Kharay. Looking at this we have started a project in Tamilnadu.

Seedballsproject.blogspot.com
मकरंदकाका said…
बरोबर. अशी जागृती आतुन येणारी हवी.तरच खऱ्या अर्थाने निसर्ग वाचेल.

Popular posts from this blog

मदनबाण

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1