प्रेम , शक्ती व ज्ञान

पूज्य साने गुरुजींची भूतदया नावाची फार प्रसिद्ध कथा आहे. घराच्या अंगणात झाडावरून पडलेल्या पाखराच्या पिल्लाला जगविण्याची धडपड करणाऱ्या भावांविषयी.

कथेतील भावा - भावांनी पिल्लाला भूक व तहान लागली असेल असे ठरवून, त्याच्या चोचीत तांदुळाच्या बारीक कण्या, कोरडे पीठ , पिठाचे लहान गोळे व झारीने थेंब थेंब पाणी पाजण्याचा सपाटा लावला.

मुलांच्या अडाणी प्रेमाने आधीच दुखावलेले ते पाखरू बेजार झाले . त्याने मान टाकली. मुलांना अत्यंत दुःख झाले.पण उपयोग शून्य.

ह्या घटनेस धरून सानेगुरुजी  निक्षून एक सत्य आपणासाठी सांगतात.

"जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते. ती म्हणजे प्रेम, शक्ती आणि ज्ञान .यातील एकही गुणाची कमतरता असेल तर कार्य यशस्वी होऊ शकत नाही."

वरील गोष्टीतील लहान भावंडांकडे त्या पाखरा विषयी प्रेम होते म्हणूनच त्याला जगवण्यासाठी आपली शक्तीही मनापासून त्यांनी खर्च केली ....पण त्या पिल्लाला काय हवे असेल याचे ज्ञान त्यांना मुळीच नव्हते.

प्रेम, शक्ती व ज्ञान ह्या गुणांचा संबंध,
दरवर्षी जून महिन्यात कोट्यावधींच्या संख्येने वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जातो त्याच्याशी फार जवळून आहे.

उजाड डोंगर व माळांवर पावसाळ्यात झाडे लावण्याच्या वनविभागाच्या वनीकरणाच्या अतिशय स्तुत्य उपक्रमाविषयी उदंड व उत्तम जनजागृती झाली आहे.

दरवर्षी वनीकरणाच्या उपक्रमात हजारो शाळा कॉलेजमधली लाखो मुले, तरुणांचे वेगवेगळे गट, सेवाभावी संस्था, गावागावातील उत्साही मंडळी, व इतरही अनेकजण मोठ्या हिरिरीने भाग घेत असतात. परंतु ह्या उत्साही मंडळींना झाड कसे लावावे ह्याचे आधी प्रशिक्षण द्यायला हवे आहे .

पिशवीतील झाड जमिनीत कसे लावावे ?

1.पिशवीतून रोप बाहेर काढताना त्याच्या बुडाचा मातीचा गठ्ठा तुटणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी.
2. रोप खड्ड्यात लावल्यावर त्याच्या बुडाशी माती हाताने किंवा पायांनी घट्ट दाबावी.
3. यानंतर महत्त्वाचे म्हणजे त्याला किमान अडीच फूट उंच काठीचा आधार देऊन सुतळीने बांधावे.

रोपाला काठीचा भक्कम आधार दिला की ते गुरांच्या अथवा माणसांच्या पायदळी तुडवले जाण्याची शक्यता कमी होते . शिवाय गवत उगवल्यावर आपण रोपे कुठे लावली होती हे कळणेही सोपे जाते.

सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमाच्या आधी टेलिव्हिजन, रेडिओ वृत्तपत्रे यातून सतत झाडे कशी लावावी याचे प्रात्यक्षिक व माहिती सांगितली गेली तर संबंधितांना कामा विषयी कल्पना येईल. प्रत्येक ग्रुपला प्रत्यक्ष कामाआधी डेमो आवर्जून दिला जावा.

रोपे काळजीपूर्वक लावली तर ती जगण्याचे प्रमाण खूप वाढेल. अर्थात रोपांची झाडे होण्यासाठी त्यांना पुढील काळात संभाव्य वणव्यांपासून सतत संरक्षण दिले तर आपले डोंगर हिरव्यागर्द वनराईने नटायला फारसा काळ लागणार नाही.

अनुराधा चं. भडसावळे.

Comments

Popular posts from this blog

मदनबाण

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1