*पवित्र कमळ व ऐहिक संपंन्नता* भाग 2 :

दैवी सौंदर्य लाभलेल्या कमळाला भारतीय संस्कृतीत अत्युच्च मानाचे स्थान दिले गेले आहे. भगवंताच्या सगुण रूपाचे वर्णन करतानाही ‘ मुखकमल, कमल वदन , कमलनयन, राजीव नेत्र , हृदय कमळ, कमलाकर, कमळप्रिय, असे केले गेले आहे. महालक्ष्मीचे तर ते निवासस्थानच आहे!!!

  गोड्या पाण्याच्या जलाशयात कमळाचे खोड चिखलात सरपटत वाढते. दोन ते तीन फूट व्यासाची गोलसर पाने उंच काटेरी दांड्यावर तोललेली असतात. कमळाच्या पानांवर मेणासारखा पातळ थर असतो. शिवाय पानाच्या पृष्ठभागावर  असंख्य अतिसूक्ष्म उंचवटे असतात. त्यामुळे पानांवर पाणी पाणी पसरत नाही. 

भल्या पहाटे सूक्ष्म दवबिंदूंचा थर शंकूच्या आकाराच्या पानभर पसरलेला  असतो . वाऱ्याचा हलका धक्का बसताच पाण्याच्या कणांचा एक छानसा पाणेरी मोती बनतो व अलगद घरंगळून मध्यभागी जमा होतो. मोत्याचे वजनाने तो ओघळूनही  जातो. पाण्या बरोबर धुलीकणही धुतले जातात. 

उगीच नाही कमळाला अनासक्ती चा आदर्श म्हंटले जात.जन्म व वाढ दलदलीत का होईना पण , दैवी सौंदर्याचे वरदान मिळालेले असूनही  निर्लेप वृत्तीने सर्वांगांनी सर्वांच्या  उपयोगी व्हायचे हे गुण माणसाने आत्मसात करावे अशीच मनीषा आपल्या  ज्ञानी पूर्वजांची असावी!

आपल्याकडे कमळाची गुलाबी आणि पांढऱ्या रंगांची फुले असतात. आठ ते बारा इंच व्यासाची सुगंधी फुले सूर्योदयाला उमलतात व सूर्यास्ताला घट्ट बंद होतात.साधारणपणे फुलाला १५ ते २० सुगंधी पाकळ्या असतात.
  
शॉवर सारख्या फळात काळ्या रंगाच्या कठीण कवचाच्या टणक बिया असतात. बियांपासून मखाणे नावाच्या लाहया करतात. बिया औषधी असतात.

         कमळाच्या बियांची अतिशय अवघड परिस्थितीतही टिकून राहण्याची  खासियत विशेषच आहे. 

प्रत्येक वनस्पतीच्या बियांची जिवंत राहण्याची क्षमता निरनिराळी असते. जसे की भाताचे बी दोन वर्षे, भुईमूग नऊ महिने, पपया च्या बिया चाळीस दिवस, कडुलिंब पंधरा दिवस पर्यंत कपाटात ठेवल्या तर जिवंत राहू शकतात रुजून येऊ शकतात.

कमळाच्या बियांची आपले सजीवत्व  टिकून धरण्याची क्षमता किती असेल? 

1000 वर्षांपेक्षा जास्त ! खरं नाही ना वाटत ? 

इजिप्तमधील पिरामिड मधील ममीच्या शेजारी ह्या बिया ठेवलेल्या सापडल्या. अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्या रुजवायला ठेवल्या तर त्यातून रोपे आली. चीनमध्ये, 1300 वर्षांपूर्वीच्या कमळाच्या बिया सुकलेल्या तलावात मिळाल्या. त्याही बिया रुजून आल्या.बियांचे वय शोधून काढण्यासाठी  शास्त्रज्ञांनी कार्बन डेटिंगच्या तंत्राचा वापर केला. 

 कमळाला उत्पत्तीचे प्रतीक मानतात.  चिखलात राहूनही प्रकाशाकडे झेपावते म्हणून  मांगल्याचे प्रतीक मानतात. 

एक गंमत सांगते, संध्याकाळी सूर्यास्ताला कमळांना बघितले तर फुले, पाने व फळे सुद्धा सूर्य प्रकाशाच्या दिशेने वळलेली दिसतात. फळांमध्ये बिया तयार झाल्या, आपले काम पूर्ण झाले ;  म्हणून प्रकाश ह्या  ध्येयापासून  * रिटायरमेंट * घेत नाहीत.  

कमळाचा स्पर्श, सुगंध व सेवन फार लाभदायी मानले गेले आहे हिंदू बौद्ध जैन मुस्लीम धर्मात कमळ पवित्र आहे .
कमळाच्या पानांचा, खोडाचा, बियांचा व फुलांचा उपयोग अन्न व औषधे यासाठी केला जातो . ही वनस्पती जलशुद्धीकरण करते. 

थायलंड व्हियएतनाम, चीन   या देशांमध्ये कमळाची लागवड केली जाते. तेथील मंदिरांमध्ये कमळ पुष्पांची नितांत सुंदर सजावट करतात. जेवणात कमळाच्या खोड, पाने, फुले यांचे विविध  पदार्थ साक्षोपाने केले जातात. 
You Tube वरील
 https://www.youtube.com/watch?v=5e4SFxxI7o4l  

https://www.youtube.com/watch?v=o33PRJR_yVI

वर कमळाच्या फुलांपासून किती किती प्रकार केले जातात ते पाहूनच मन थक्क होऊन जाते.  कोरिया ,चीन , जपान ह्या देशांमध्ये कमळाच्या सौंदर्याची प्रशंसा करणारा लोटस फेस्टिवल साजरा केला जातो. 

कमळ ही जगाला भारताने दिलेली देणगी असूनही 99 टक्के भारतीयांना कमळ आणि कुमुद यातील फरक माहित नाही ही खेदाची गोष्ट आहे. महालक्ष्मी मंदिराजवळ विविधरंगी कुमुद ची फुले कमळ म्हणून सर्रास विकली जातात. अज्ञानाने कमळ समजून देवीला अर्पणही केली जातात. कुमुद ही  सुद्धा पाणवनस्पती आहे. पण ती  म्हणजे कमळ नक्कीच नव्हे . 

कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे. त्याचे जतन, संवर्धन करण्या ऐवजी आमच्याकडे कमळांचे तलाव भर घालून, बुजवून त्यावर इमले चढवले जातात

कमळ - पाणी - जीवन - भरभराट - लक्ष्मी यांचे अतूट नाते आहे. आम्ही ते अनुभवले आहे. 

निसर्ग सौंदर्य, जैव विविधता, जल संपन्नता, थंड  पण उबदार हवामान  अशा निर्भेळ आनंदाची चव आपण व आपल्या पुढच्या पिढ्यांनी चाखायची  असेल तर प्रयत्नपूर्वक लागवड करून कमळे फुलवायला हवीत.

चला तर मग , शक्य असेल तर खरे कमाल समजून घेऊया व ह्या सजीव लक्ष्मीला आपापल्या घरी जरूर लावूया.

सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे. 
anu.bhadsavle@gmail.com

Comments

Popular posts from this blog

मदनबाण

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1