फुलपाखरांची झुंबरे

पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली की हळूहळू दिवसाला वळसा देऊन रात्र मोठी व्हायला लागते.
थंडीची चाहूल लागली की बागेमध्ये हजारोंच्या संख्येने चिमुकले, उडणारे, रंगीबेरंगी पाहुणे येऊ लागतात.
गर्द झाडी, उबदार हवामान आणि पुरेशी आर्द्रता असेच ठिकाण यांच्या आवडीचे.  येथेच न चुकता दरवर्षी वस्तीला येतत.

"शू sssss शू ssssss आजीsss
 बोलू नकोस हो......."
लहानग्या ओठांचा चंबू करून त्यावर बोट ठेवून डोळे मोsठे करून  दबक्या आवाजात नातीची पहिली सूचना येते.

दोन पावलं पुढे जाताच पायाखाली, पानगळीच्या वाळलेल्या पानांचा चर्रर्रर्रsss  आवाज येताच, 

"आsजी ग, पाय नको ना वाजवू… फूफुले झोपलेत ना?" 

 क्षणभर  हरवले... "पाय नका वाजवू, कुणीही पाय नका वाजवू" ह्या नितांत सुंदर, भावविभोर अंगाई गीतात.

 बागेत   लोम्बणाऱ्या फांद्यांवर, वेलींवर जागोजागी सुकलेल्या पानां सारखे  दिसणारे, पंख मिटलेल्या फुलपाखरांचे घोस चे घोस झुंबरांसारखे लटकलेले दिसु लागले.

वाऱ्याची हलकी झुळूक आली आणि ‘बागेला रंगीत पंख फुटले’. पिवळ्या काळ्या रंगाच्या नाजूक  पंखांची उघडीप सुरू झाली .सूर्य किरणांची उब झाडीत पोचताच हे छोटे जीव सक्रिय बनले. सगळ्यांची बाहेर, सूर्यप्रकाशात जाण्याची एकच झुंबड उडाली.

आणि….. काय आश्चर्य, पाहता पाहता मिटलेल्या  पानांची फुलपाखरे झाली… हजारोंच्या संख्येने एकाच वेळी पंख वरखाली उमलून वातावरण जादुई होऊ लागले. हे वैभव अनुभवताना  भगवंता विषयी कौतुक दाटून आले.

लहानग्या सदाशिवाला, पंडितजींनी, “ मन मंदिरा” म्हटल्यावर काजव्यांचा साक्षात्कार झाला तसे वाटले अगदी .

"कुठून येतात ग हे  फूss फुले?"

बागेत प्रामुख्याने स्ट्रीपङ  टायगर (Striped Tiger) तर  काही प्रमाणात ब्लू टायगर आणि कॉमन क्रो जातीची  फुलपाखरे रुस्टींग (Roosting) करतात. ह्या फुलपाखरांना मिल्कवीड बटरफ्लाईज म्हणतात.

फुलपाखरांच्या वाढीसाठी  दोन प्रकारच्या वनस्पतींची गरज असते. 

1. अळ्या वाढण्यासाठी रुई, मंदार सारख्या विषारी चीकाच्या - milk weed जातीच्या वनस्पती. ह्यांची पाने खाऊन अळ्या व पर्यायाने त्यांचे पतंग विषारी बनतात. 
2. फुलपाखरांसाठी मधुर रस/ मध असणारा फुलोरा धारण करणाऱ्या हस्तिशुंड, खुळखुळा ,टणटणी इ.  झुडुपे. 

जीवनक्रम 

अंड /Egg
फुलपाखरे दिवसा खुळखुळा, टणटणी, दगडी. कोंबडा इत्यादी कमी उंचीच्या झाडांच्या फुलोऱ्यावर रुंजी घालताना दिसतात.
फुलपाखराची मादी रुई सारख्या विषारी वनस्पतींच्या पानाच्या खाली एक एक किंवा पुंजक्याने  अंडी घालते. .

सुरवंट / अळी /Caterpillar

दोन ते चार दिवसात अंड फुटून लहानशी काळ्या रंगाची  पिवळ्या ठिपक्यांचे पट्टेवाली  अळी बाहेर पडते. ह्या सुरवंटाला खूप भूक लागलेली असते.  ही खादाड अळी त्या झाडावरील कोवळी पाने, कळ्या , फुलांचा पंधरा वीस दिवसात फडशा  पाडते. या काळात वाढताना ती  तीन ते चार वेळा कात टाकते. अळी जेवढी पोसलेली तेवढे फुलपाखरू मोठे होते. 

कोष / Pupa

अळीची पूर्ण वाढ झाली ,अंदाजे १ ते १ १/२  इंच ,की  ती  खाणे थांबवते. कोष बनण्यासाठी पानाखाली सुरक्षित जागा शोधू लागते. एका जागी स्थिर झाल्यावर तिथे लटकते.  तिची त्वचा,पाय व मुख सुद्धा गळून पडतात . तिचा हिरव्या रंगाचा , वरच्या कडेला सोनेरी- पिवळ्या ठिपक्यांची नक्षी असलेला  कोष बनतो. या कोषाच्या आत सुरवंट स्वतःला अक्षरश:  पचवतो. अळीच्या शरीराचे सूप तयार  होते. 

फुलपाखरू / पतंग /Adult Butterfly

कोषाच्या  आतील सूप आपल्या वाढीसाठी वापरून   फुलपाखरू वाढू लागते. अनुकूल वातावरणात कोष भेदून ओलसर पंख असलेले फुलपाखरू बाहेर पडते. तास दीड तासात पंख सुकून सहचराच्या आणि अन्नासाठी फुलांच्या  शोधात पंख फडफडून निघते.  भडक रंग  फुलपाखराच्या विषारीपणाची जाहिरात करतात  व पक्षी,सरडे इ भक्षकांना दूर ठेवतात.
उणेपुरे महिन्याभराच्या आयुष्य!

वातावरणातल्या तीव्रतेची फुलपाखरे जुळवून घेऊ शकत नाहीत. म्हणून ते पर्यावरणाचे द्योतक समजले जातात. 
सगुणा बागेतील जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढताच फुलपाखरे वस्तीसाठी आवर्जून येऊ लागली.

फुलपाखरे मानवी जीवनाचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते.

जीवनामध्ये अपरिहार्यपणे होणारे बदल, त्यासाठी आवश्यक सहनशक्ती,आत्मविश्वास व भविष्याची उमेद राखून होणारा प्रवास या गोष्टी फुलपाखराच्या लहानशा आयुष्यात झपाट्याने घडून जातात. आपल्या अस्तित्वाने ते सगळ्यांना अतीव आनंद देतात. 

आभाला  उत्तर: 

फुलपाखरे अन्न व  पोषक हवामाना साठी कमी जास्त अंतराचे स्थलांतरण करतात. एवढ्या कमी आयुष्यमधें तीच 
पाखरे पूनः  त्याच जागी येणे कठीण नाही तर अश्यक्यच आहे. 
खरंतर प्रत्येक वेळेला नवीनच कीटक त्याच मार्गाने ठराविक ठिकाणी येण्यासाठी प्रवास करतात. त्यांना मार्ग व जागा कशी कळते हे  शास्त्रज्ञांनाही न सुटलेले कोडे आहे.
आपल्याला त्यांच्या प्रवासामुळे Butterfly Congregation पाहण्याचा आनंद दरवर्षी मिळतो हे नक्की !

छोट्या  आभाच्या “का?’ मुळे फुलपाखरांच्या जगात फेरफटका बाकी झाला 😊 😊

सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
anu.bhadsavle@gmail.com

Comments

Popular posts from this blog

मदनबाण

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1