व्यक्त - अव्यक्त ( Steam fog / steam smoke )
आजही लेकरू लवकर उठले.
“ मी पण येणार आहे तुझ्याबरोबर. फिरायला आणि गंमती बघायला”
स्वेटर , कानटोपी, मोजे असा साज नाखुषीने लेवून बाईसाहेब तयार झाल्या.
“ अग आजी, तलावातून धूर बघ किती येतोय, बघ ना लवकर! ” तिच्या गंमतीमध्ये मी पण आनंदाने सामील झाले.
“पण असं का........ ?” प्रश्न आलाच .
सूर्य जरासा कुठे डोकावू लागला होता.
चर्रर्र थंडीत तलावाच्या पृष्ठभागावरून चंदेरी हलके ढग तरंगत वर येत होते.
प्रसन्नतेचा हा अविष्कार पाहताना पावले थबकलीच.
……...आणि कोवळ्या सूर्य प्रकाशात एक विलक्षण दृश्य दिसू लागले. तलावाने त्याच्या पृष्ठभागावर धुक्याची हलकी शाल पांघरली होती . हलक्या वाऱ्यात घुक्यातील पाण्याचे कण एकमेकांशी मस्ती करत होते . असं दिसत होतं की जणू तलावातून वाफाच बाहेर पडत आहेत! ( Steam fog/ steam smoke)
' का बरं तलाव ,नदी यातून थंडीतल्या सकाळी सकाळी वाफा निघताना दिसतात? आत्ता हे पाणी गरम तर नाही ना ?'
लगेच आठवले, 'साधारणपणे नोव्हेंबरमध्ये थंडीत पहाटे नदीवर कार्तिक स्नानाला गेलं की पाणी छान उबदार असतं आणि संध्याकाळी मात्र थंडगार असते.'
असे का ? हा प्रश्न तेव्हाही पडला होता पण पाठपुरावा झाला नव्हता.
आता प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी असल्याने कारणाचा शोध घेतला.
शाळेत शिकले होते की जमीन लवकर तापते व लवकर थंड होते तसेच पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते.
पण शिकलेले उमजायला..... अनुभव घ्यावा लागतो.
श्री. विनोबाजी म्हणतात तसे,
‘शब्द पुस्तकात असतात आणि त्यांचा अर्थ आयुष्यात असतो’.
सूर्यप्रकाश व त्याबरोबर उष्णता:
पृथ्वीवरील जमीन व पाण्यावर एकसारखेच एकाच वेळी पोहचतात. पण उष्णतेचा परिणाम दोन्हीकडे
वेगवेगळा होतो.
जमीन घन व अपारदर्शक असल्याने उष्णता जमिनीच्या वरच्या थरातच राहते. सायंकाळी हवामान थंड झाल्याबरोबर जमिनीतील उष्णता हवेत खेचली जाते. असे जमिनीचे तापणे व थंड होणे वाळवंटात प्रकर्षाने अनुभवायला येते.
पाण्याचे बाकी तसे नसते .
पाणी हे द्रव , व अर्धपारदर्शक .
द्रव असल्याने सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने पाण्याचा वरचा थर तापला की अभिसरणणाने खालचे गार पाणी वर येते. पाण्याचा खालचा स्तर गरम होतो. दिवसभर हे तापणे चालूच राहते. घरी आधण ठेवल्यावर खालचे गॅस जवळचे पाणी आपोआप वर जाते हे आपण रोज अनुभवतोच.
पाणी अर्ध - पारदर्शक असल्यामुळे सूर्यप्रकशाची उष्णता पाण्यामध्ये शोषली जाते. दिवसभराची उष्णता शोषल्यामुळे व अभिसरणामुळे नदीचे पाणी उबदार बनते.
पाण्याचा आणि एक गुणधर्म म्हणजे ते उष्णता पटकन सोडत नाही. उष्णता धरून ठेवते. म्हणून तर गरम पाण्याची पिशवी
शेकायला वापरतात.
हवामान रात्री थंड झाले तरी ते पाणी गार होत नाही. पाण्याचा वरचा थर गार झाला तरी खालचे गरम पाणी त्यात मिसळते व पाणी उबदार राहते. त्यामुळे थंडीच्या दिवसातही रात्री व पहाटे वातावरण थंड असले तरीही नदी, तलावातील पाणी उबदार राहते.
आता जाऊ वाफाळलेल्या तलावाकडे. तलावापाशी मजेशीर गोष्टी घडत असतात.
तलावाचं पाणी असते उबदार. आणि त्याच्या पृष्ठभागाच्वरच्या हवेचे तापमान असतं थंडगार .
वातावरण व तलावाच्या तापमानातील व आर्द्रतेतील फरकामुळे पाण्याची वाफ होतच राहते... ओले कपडे म्हणून तर पावसाळा वगळता सहज वाळतात.......
थंड हवामानात, तलावातील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणाऱ्या वाफेने वातावरणात प्रवेश करताच धुक्याच्या रूपाने ते साकार होते. डोळ्यांना दिसू लागते.
तर आता आडीच वर्षाच्या नातीला उत्तर :
"सकाळी आपल्या तोंडातील वाफ कशी धुरासारखी दिसते? तशीच तलावातील पाण्यातली वाफ दिसते.
पण सोन्या , त्याला धूर नाही तर धुकं म्हणतात"
पहाटेच्या वेळच्या सूर्यप्रकाशाने मला तलावाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली…..नाहीतर हा बाष्पाच्या घनीकरणाचाचा खेळ अखंड चालूच होता की !! “त्याने पाणी निर्माण केले व तो त्यात शिरला” असे वाचून होते.
पाण्याचे , अव्यक्त बाष्प, व व्यक्त धुकं ह्या रुपांत त्याचेच मनोहर दर्शन होण्यासाठी सुर्यप्रकाशा सारख्या श्रीगुरूंची कृपा बाकी आवश्यकच आहे बाकी.!!!
सौ अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
anu.bhadsavle@gmail.com
Comments