SVT चे अग्निदिव्य ......


विसाव्या शतकात डोंगरांवर वणवे क्वचितच लागलेले दिसत असत. परंतु एकविसाव्या शतकात वणव्यांचे व्याप, व्यापकता आणि दाहकता अती  झाली आहे. डिसेंबर जानेवारीतच डोंगर पेटू लागलेले आहेत. 

पाऊस सुरु झाला की एरवी ओकेबोके असणारे डोंगरे एकाएकी  हिरवे होऊ लागतात. तिथली खुरटी झाडेझुडपे पानवतात. जोमाने फुटू लागतात. डोंगर  दऱ्यांत  ,कपारीत , वळचणींमध्ये, ओढ्यांच्या कडा कडांनीं, सर्वत्र गवत उगवते,  वाढते व श्रावणातल्या उन्हामध्ये सरसरून उंच होते . फुलते व पाऊस संपल्याबरोबर सुकते. चार महिन्यांचा जीवनक्रम!  
डोंगर पिवळे पडतात. हे सुकलेले गवत-झाडांची गळलेली पाने, काडीकचरा अत्यंत स्फोटक असते. अशा ज्वालाग्राही जागेला मग वणवे लागतात. 

वणवे  लागत नाहीत ते स्थानिक लोकांच्या क्षुल्लक स्वार्थासाठी लावले जातात. त्याची काही कारणे:

1. विनासायास जळाऊ लाकडे मिळवणे. 
2. जंगलात मोहाची झाडे असतात. त्याच्या फुलांपासून मद्य निर्मिती केली जाते. ही फुले गोळा करणे सोपे जावे यासाठी.  
3. डोंगरावरील ससे ,भेकर, रानडुक्कर किंवा इतर काही शिकार दिसावी  म्हणून डोंगर बोडके केले जातात.
4. पहिले गवत जाळले तर गुरांना चरण्यासाठी चांगल्या प्रतीचे नवीन गवत उगवते हा गैरसमज.
5. पर्यटकांची बेफिकिरी.
6. विजेच्या तारांच्या ठिणग्यांमुळे  काही वेळा वणवे लागतात.

मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला   स्फोटक काडी कचरा काडेपेटीच्या एका काडीने पेट घेतो. वणवा पिसाटतो. अनियंत्रित आगीचे भीषण रूप धारण करतो. गवत सरसर पेटते.  गवताच्या  तडतडणाऱ्या ठिणग्या आसमंतात उडू लागतात. त्सुनामीच्या  आवेगाने पसरणाऱ्या ज्वाला, धूर, ठिणग्या,ओल्या वनस्पती पेटल्याचा तडतडण्याचा आवाज व वास,  उष्णतेच्या हळा यांनी सभोवतालची झाडे त्यावरील पक्षी त्यांची घरटी, पिल्ले, सरपटणारे प्राणी, ससे , मोर यासारखे वन्य  प्राणी व वन्य जीवांची वाताहात  होते.  जंगलाची अन्य साधन संपत्ती होरपळून जाते. 

        सामान्यपणे आपण सर्वजण प्रतिक्रिया देतो:
“बापरे! किती लौकर वणवे लागलेत यंदा ?
         “वनखाते काहीच कसं करत नाही या बाबतीत ?"
     " वणवे विझवा. आग आटोक्यात आणा . आमची फुप्फुसे नष्ट होत आहेत"
               वगैरे बोलून पुढे जातो.
कृषिरत्न कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे ह्याना मात्र हा  वणव्यांनी फार अस्वस्थ करून सोडले. इतके की  त्यांनी वणवे लागूच नयेत ह्यासाठी आपल्या मालकीच्या लहान टेकडीवर सतत ३ वर्षे प्रयोग मालिका घेतली व SVT … सगुणा  वन संवर्धन तंत्र शोधून काढले. 

SVT तंत्र

पावसाळ्यात तयार  होणारे गवत सप्टेंबर मध्ये हिरवे रसरशीत असते  त्यामध्ये 
८५ % पाणी असते.  यावेळी ते जर त्याच जागी कुजले तर ते गांडुळां साठी अन्न बनते. व नंतर त्या गवताचे उत्तम  खत तयार होते.  मातीची कणरचना सुधारते. गांडूळामुळे जमीन सच्छिद्र होऊन पडणारे पावसाचे पाणी डोंगरात झिरपते.

हे गवत हळूहळू  कुजले की त्या जागी भांबुर्डी सारखी वनस्पती उगवते. ही वनस्पती पोपटी हिरव्या रंगाच्या मांसल पानांची, निळ्या गुच्छयांच्या  फुलांची असून जमिनीलगतच वाढते. हिच्या पानात एवढे पाणी असते की  चार पाने हातावर चोळली तर त्यातून  दहा-बारा थेंब औषधी रस टिपकतो. ज्वालाग्राही गवताच्या जागी आगीला सहज बळी न पडणाऱ्या  मारबीट्टी किंवा भांबुर्डी वनस्पतीचे अच्छादन तयार होते.

अग्निपरीक्षा
वनखात्याने प्रयोगासाठी नेरळ मधील ४ टेकड्या शेखर यांना प्रयोगासाठी वापरण्यास परवानगी दिली. 

नेरळ ची दोन नंबरची टेकडी: 

 यातील अर्धा भाग खाजगी आहे.  तेथे  SVT तंत्र वापरले जात नाही. तर अर्धा भाग सरकारी जेथे SVT तंत्राचा प्रयोग गेले दोन वर्ष सातत्याने केला जात आहे.

गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही ही टेकडी जानेवारीत  पेटली. वणवा लावला गेला. खाजगी जमिनीतून गवताने पेट घेतला. तेथील २५० एकर जमिनीवरील सुकलेल्या उंच गवताने पेट घेतला. 3-4 तासात संपूर्ण जागा बेचिराख झाली. 

शेजारील साधारण 250 एकर सरकारी जमिनीवर SVT चा प्रयोग होता.  तडतडणाऱ्या  ठिणग्या तिथेही आग लावू शकत होत्या. परंतु मध्ये  लक्ष्मणरेषे सारखी वाट अडवून भांबुर्डी ची संरक्षक पट्टी पसरली होती. या ठिकाणी जळण्या सारखे गवत शिल्लक नसल्यामुळे आग पुढे पसरू शकली नाही.

सगुणा वनसंवर्धन तंत्राचे हे  अग्निदिव्य होते. ह्या अग्निपरीक्षेत हे तंत्र सलग दुसऱ्या वर्षीही   डिस्टींक्शन सह पास झाले.

SVT तंत्राची ताकद  जगभर लागणाऱ्या  वणव्यांच्या समस्येला पेलून धरण्याची आहे. 

आपला भारत पुनश्च ‘ वंदे मातरम्‘ गीतातल्या सारखा  व्हावा अशी मनोमन इच्छा  असेल तर सगुणा वनसंवर्धन तंत्राची   ओळख व उपयोग निसर्गप्रेमी मंडळींनी , वृक्षारोपण  करणाऱ्या  संघटनांनी, वनखात्याने जरूर करून घेतली पाहिजे . कारण हे तंत्र  प्रतक्ष निसर्गाच्या रौद्र *अग्निदिव्यातून* तावून-सुलाखून सिद्ध झालेले आहे.

सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
anu.bhadsavle @gmail.com

Comments

Popular posts from this blog

मदनबाण

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1