पृथ्वी : एक महाकाय सजीव
पृथ्वी : एक महाकाय सजीव
आपली पृथ्वी हा सुर्यमालेमधला सूर्यापासून तिसरा ग्रह. पृथ्वीच्या अलीकडचे बुध व शुक्र
सूर्याच्या जवळ असल्याने अतिशय तप्त … अनुक्रमे सरासरी 167 व 462 डिग्री से. तापमानाचे.
पृथ्वीच्या पलिकडचे गुरु, शनी पासून प्लूटो पर्यंतचे सहा ग्रह अत्यंत शीत: सरासरी
- 110 ते - 225 डिग्री सेल्सिअस राखणारे.
खरे तर पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर पाहता तिचे सरासरी तापमान 53 डिग्री से. असायला हवे होते. पण प्रत्यक्षात ते 13 डिग्री से. सरासरी आहे.
पृथ्वी हा ग्रह सजीवांच्या जीवनासाठी परिपूर्ण आहे ; हा योगायोग असूच शकत नाही असे ब्रिटिश शास्त्रज्ञ प्रो. जेम्स लव्हलॉक यांना अमेरिकेतील नासा संस्थेमध्ये मंगळावरील वातावरणाचा जीवसृष्टी संदर्भात अभ्यास करताना जाणवले.
सखोल अभ्यास व संशोधनानंतर पृथ्वी ही एक महाकाय सजीव असल्या विषयीची गाया संकल्पना त्यांनी 1970 च्या दशकात मांडली.
गाया ही ग्रीकांची भू देवता.
गाया संकल्पनेनुसार ,
“ पृथ्वीवरच्या सर्व सजीवांची मिळून कोळ्याच्या जाळ्या प्रमाणे जोडली गेलेली अशी एक सुसंघटित जीवसंस्था बनते. एकच सजीव प्राणी असल्याप्रमाणे हा महाजीव आपल्या भोवतालचे पर्यावरण स्वतःला जास्तीत जास्त अनुकूल कसे होईल ह्यासाठी सतत जागरूकतेने कार्यरत असतो”.
प्राणी, पक्षी, वनस्पती, पाण्यातील वेगवेगळ्या स्तरातील लहान मोठे मासे, जमीन- पाणी- वातावरणातील सूक्ष्मजीव असे सारे मिळून हा महाकाय सजीव ‘गाया’ तयार झाला आहे.
पृथ्वीवरील खानिज, माती, पाणी, वातावरणातील वायू, सूर्यप्रकाश इत्यादी अजैविक घटकांबरोबरील गायाच्या परस्पर पूरक क्रियांनी सजीवांना पोषक वातावरण निर्माण केले आहे.
जसे की ,
1. पृथ्वी वरील सरासरी तापमान सजीव सृष्टीला मदतरूप असे 13 डिग्री सेल्सियस राखले जाते.
2.सूर्यमालेतील इतर ग्रहांवर CO 2 चे प्रमाण 98 % आहे. पण पृथ्वीवर मात्र हे
प्रमाण 0.03 % एवढे आहे.
3. ऑक्सिजनचे इतर ग्रहांवर प्रमाण अत्यल्प आहे परंतु पृथ्वीवर मात्र ते 21 % आहे.
4. पृथ्वीचा 71 टक्के भाग समुद्र आहे. पाऊस, नद्या ह्याद्वारे कितीही गोडे पाणी समुद्रात मिसळले तरीही समुद्रात सागरी जीवांना योग्य अशी सरासरी 3.4% क्षारता कायम राखली जाते.
वरील उदाहरणांविषयी जास्त माहितीसाठी संदर्भ: https://g.co/kgs/pvDrbY
“सजीवाच्या आनंदाला बाधा पोचवणाऱ्या जखमांची दुरुस्ती व रोगांचा प्रतिकार त्यांच्यातील अंतर्गत ऊर्जेने केला जातो” हे सत्य आपण स्वतः नेहमी अनुभवतो. आपल्याला झालेल्या जखमा,खरचटणे अथवा लहानसहान आजार औषधोपचारांविना बरे होतातच ना?
जैव विविधता व साधन संपत्तीचा ह्रास झाल्याने निसर्गाला जखम होऊन त्याची प्रकृती डळमळीत झाली आहे असे आपण ऐकतो, वाचतो, पाहतो.
महा उपद्व्यापी मानवाच्या अधिकाच्या मोहा मुळे गाया देवी ,दुःखी कष्टी होऊ लागली आहे की काय? त्रस्त होऊन, संतप्त होऊन प्रतिकार करते आहे का? अवकाळी पाऊस, त्सुनामी, चक्रीवादळे , महापूर , भूकंप ज्वालामुखी यांचे उद्रेक ह्या स्वरूपात ती व्यक्त होते आहे का?
असे तर झाले नसेल ना की अदृश्य करोना विषाणूच्या रूपात गाया माता मानव जातीवर जोरदार प्रतिहल्ला चढवित असेल? त्याला नामोहरम करून शांत रहायला भाग पाडत असेल? मृत्यूच्या महाभयाने तरी माणूस शहाणा होतो की नाही याची परीक्षा घेत असेल?
कोरोनाच्या रूपात आठवडा पंधरा दिवसांवर सामोऱ्या आलेल्या मृत्यूच्या सावटाने माणसांचे अखंड धावणे थांबलेले दिसत आहे. अर्थातच सर्व प्रकारचे प्रदूषण अत्यंत कमी झाले आहे.माणूस शहाणा झाल्या सारखा वागू लागला आहे.
मानवाने निसर्गात मोडतोड, ढवळाढवळ करणे कमी केले पाहिजे. नपेक्षा प्रो. जेम्स लव्हलॉक यांनी भाकित केले आहे की 2040 पर्यंत जगातील सहा अब्जांपेक्षा पेक्षा जास्त लोकसंख्या नैसर्गिक आपत्तीने नष्ट होऊन जाईल.
सकाळी उठून
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥
हे भूमाते, तुला पाय लावण्याबद्दल ( सुद्धा) मला क्षमा कर अशी विनंती करून ( पण प्रत्यक्षात तुझ्यावर नांगर चालवून). ....पुन्हा प्रदूषण कार्याला हातभार लागेल असे ‘अधिकची हाव’ धरून जगायचे की पर्यावरण पूरक,‘गरजेपुरते हवे’ अशी जीवन पद्धती स्वीकारायची ह्याची निवड करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
Comments