आभाळ-फुलांचे विलक्षण झाड
आभाळ-फुलांचे विलक्षण झाड
आज चांदण्यांच्या फुलांचे झाड पाहिलं.
आमची लेक टेकडीवर राहते. घराचे नाव वृंदावन. रात्री तिच्या अंगणामध्ये दिवे बंद करून नातवंडं ग्रहांची, आकाशाची ओळख करून घेत होती. तेवढ्यात बकुळीचा चिरपरिचित मंद सुगंध वाऱ्याबरोबर आला. अचानक केतकी म्हणाली,
“आई, तुला चांदण्यांचं झाड पाहायचंय?”
ही कल्पनाच इतकी भारी, मोहक होती, की लगेच ,
" होss चल ना" उत्तर आले.
तिच्या अंगणात एक मोठं वेहेळयाचं
( बेहेडा ) झाड आहे.
वेहेळा ( Terminalia bellirica) पानझडी. आत्ता संपूर्ण निष्पर्ण. फुलांच्या आगमनाची पूर्वतयारीच ती. वेहळ्याचं झाड फार देखण. सरळ, उंच खोडाला काटकोनात तर जमिनीला समांतर जाणाऱ्या मुख्य फांद्या, त्यांना फुटलेल्या लहान लहान उपफांद्या ,…. त्यांच्या टोकाशी टरारलेल्या कळ्या... !
काहीतरी छान पाहायला मिळणार आहे ह्याची कल्पना आल्याने मुलं नातवंडांचे कान टवकारले.
कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे रस्ताही वाहता नव्हता. कशाही निमित्त भोंगे वाजत नव्हते. नुसती निखळ शांतता.
खेड्यात, शिवाय उंचावर असल्याने प्रकाशाचे प्रदूषणही नव्हते.
विनायकी चतुर्थीची चंद्राची कोर आणि जवळच असलेला शुक्र दोघेही मावळतीला टेकले होते. त्यामुळे चंद्राचं किंवा शुक्राच चांदणं बिलकुल नव्हतं. दाट अंधारात सगळं आकाश कसं चांदण्यांनी फुलून गेल होत.
कानांनी काही ऐकू येत नव्हते म्हणून दृष्टी सतेज बनली.
आणि
वेहळ्या खाली एका वेगळ्याच जगात गेल्यासारखी स्थिती झाली. नभातल्या चांदण्या आणि झाडाचा विस्तार यातलं अंतरच नाहीस झालं. लहान लहान फांद्यांवर आकाशातल्या चांदण्यांचे घोस चमचमत होते तर कुठे एकएकट्या ताऱ्याची लखलख दृष्टी खेचून घेत होती. सगळं झाडच जणू चांदण्यांच्या फुलांनी ओतप्रोत भरून जाऊन वेगळ्याच दिमाखात ‘हू ss शार’ मध्ये उभे होते.
इतका वेळ दूरदूर वाटणाऱ्या चांदण्या अचानक अगदी जवळ, अंगणात उतरल्या होत्या. वेगळ्याच आनंदाने मन लख्ख उजळून गेलं.
'भगवंताच्या' अनुसंधानात राहणं जमलं तर असाच ‘तो’ भेटत असेल का, दर्शन देत असेल का कधी तरी अचानक?
सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
anu.bhadsavle@gmail.com
Comments