लटकणाऱ्या सुंदर फुलांच्या माळांचा गोड्या पाण्याकाठचा वृक्ष: नेवर
लटकणाऱ्या सुंदर फुलांच्या माळांचा गोड्या पाण्याकाठचा वृक्ष: नेवर
“ आई, होळीचे रंग संपले नाहीत का इथले अजून?”
फिरायला गेलेले असताना तलावावर अचानक थबकून पाण्याच्या काठावरील पृष्ठभागावर झगझगीत लाल - गुलाबी रंगाच्या कार्पेट कडे पाहून माझा नातू आर्चितने , कस्तुरीला विचारले.
“ तलावाच्या काठच्या झाडावर लटकणाऱ्या फुलांच्या खूप माळा होत्या का गं ? ....मी
“ नाही पाहिलं गं ?” ....कस्तुरी
“ब ss रं, मग तिथे तुम्हाला काही वेगळा सुगंध आला का ?”... “हो ना ? मग, नेवर फुललेली दिसतेय”......मी.
नेवर/ तिवर ( Barrigtonia acutangula. Family: Lecythidaceae.)
म्हणजे गोड्या पाण्याचं मँग्रोव्ह.
हा वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टीने औषधी आहे. संस्कृत मध्ये हिज्जा तर धात्रिफल किंवा नर्स चे फळ असेही याचे नाव आहे.
झाडाची साल, पाने, फळे व मुळे औषधासाठी वापरतात.
विशेष: नेवरच्या झाडाची साल मासेमारीसाठी वापरली जाते. सालापासून मासेमारीसाठी माज तयार करतात.
माज : जगभर काही विशेष वनस्पती मच्छीमारीसाठी वापरल्या जातात. अशा वनस्पतींची पाने अथवा साल चेचून कपारीत घालतात. तलावात त्यातील रसायान विरघळल्यावर त्या भागातील मासेमूर्च्छित होतात व पाण्यावर तरंगू लागतात. मग त्यांना सहजपणे टोपलीत वेचून घेतात. अशा प्रकारची मासेमारी जपूनच केली जाते. अन्यथा त्या जलाशयातील सर्व मासे मरून जाण्याचा धोका असतो.
एप्रिल-मे महिन्यात लाल रंगाच्या सुंदर, बारीक, भरपूर पुकेसर असणाऱ्या लटकणाऱ्या फुलांच्या लांब माळांचा मध्यम उंचीचा वृक्ष कोकणामध्ये ओढे, नदीकिनारी हमखास आढळतो. बगीच्यामध्ये लागवड ही करता येते. ह्या सदापर्णी वृक्षाच्या फांद्या जमीनीला भेटायला आतुर झाल्यासारख्या लोंबणाऱ्या. फांदीच्या टोकाशी गुच्छाने येणारी पाने स्पर्शाला चामड्या सारखी; जाड आणि पटकन न चुरगळणारी.
.
फुलांचे वैभव तर काय वर्णावं ?
पसरलेल्या फांद्यांच्या शेंड्यांकडे एक फुटापेक्षा जास्त लांब अशा लाल रंगाच्या लहान ,सुगंधी फुलांच्या अत्यंत शोभिवंत असंख्य माळा लटकत असतात. मंजिरीतील शोभिवंत फुलांच्या पाकळ्या अत्यंत मऊ, मेणासारख्या असतात. फुले रात्री फुलतात आणि सकाळपर्यंत पाकळ्या व पुकेसर हळुवारपणे जमिनीकडे किंवा पाण्यात झेपावतात.
नेवर सहसा जलाशयाजवळ असते. त्यामुळे झाडाखाली तलावाच्या पृष्ठभागावर लाल फुलांचा गालीचा घातल्या सारखा दिसतो. काही ठिकाणी फुले पुंजक्याने तरंगत असतात वाऱ्याने हलतात व इकडे तिकडे तरंगत जातात.
सूर्योदयाच्या सुमाराला पूर्वेच्या गुलाबी, शेंदरी प्रकाश किरणात लाल फुले गुलाबी भासू लागतात.
त्या सुगंधी सौंदर्याचं , चमकदार गुलाबी रंगाच्या अवर्णनीय अशा सुंदर रंग - गंधाच्या शांत फुलण्याच्या सोहळ्याच कसं वर्णन करणार?
सृष्टीकर्त्याला मनोमन दंडवत घालून वसंतातल्या त्याच्या निर्मितीचे कौतुक पहाण्यासाठी आपण सजग रहावे हेच खरे!
anu.bhadsavle @ gmail.com
Comments