सिकाडा......एक भूमिगत साधक !!
काल संध्याकाळी घरातील एका कोपऱ्यातून अचानक कर्कश आवाज आला….येतच राहिला म्हणून शोध घेतला.
“अरे ssssssss , हा तर सिकाडा !”.... शेखर
“ पुनरुत्पादनाचे ध्येय घेऊन सतरा वर्षांची तपश्चर्या करून बाहेर पडलाय तो !” ...... कस्तुऱी
सिकाडा अवतरतो तोच मुळी द्रुत गतीने ढोल ताशे बडवल्या सारख्य आवाजाने परिसर दणाणून टाकून! त्याची चाहूल लागली की वसंताला निरोप देऊन ग्रीष्माच्या स्वागताची वेळ आली आहे असे समजावे.
सिकाडाचे जीवनचक्र समजून घ्यायाला मजेशीर आहे.
सिकाडाच्या अळ्या ( nymphs ) पानगळीच्या वृक्षांखाली वाढतात. जातीनुसार त्या 13 ते 17 वर्षापर्यंत भूमिगत राहतात. ह्या काळात त्या जमिनीखाली बोगद्यांचे जाळं तयार करतात. झाडाची कुजलेली मुळे व पालापाचोळाव वापरून जमीन सुपीक व सच्छिद्र बनवतात.चार वेळा कात टाकुन त्या मोठ्या होतात.
17 वर्षानंतर ग्रीष्माची चाहूल लागल्याबरोबर उष्ण हवामानात ह्या आळ्या एकदम, एकाच वेळी बाहेर पडतात व जवळील झाडाच्या खोडावर कूच करतात. आता त्यांचा जुना कोष पूनः एकदा टाकून नवीन शरीर धारण करण्यासाठी त्या सिद्ध असतात. नव्या शरीराचा- दोन मोठे डोळे, अँटेना व पंखांच्या दोन जोड्या असा थाट असतो. पंख असूनही शरीर बोजड असल्याने सिकाडा चांगले उडू शकत नाहीत. पण झाडाच्या सालीला चिकटून राहून परिसर बाकी दणाणून टाकतात.
एकाच वेळी प्रचंड संख्येने अवतरणे व चांगले उडता न येणे ह्यामुळे खूप संख्येने हे किडे मरण पावतात. खारी, उंदीर ,बेडूक , मुंगूस इत्यादीं प्रमाणेच जलाशयातील मासे व कासवे इत्यादींची महिनाभर चांगली चैन होते.
नर आपले शरीर कंपित करून कर्कश आवाजात मादीला साद घालत असतात. मादी मात्र तिच्या पंखांनी टिचकी सारख्या आवाजाने प्रतिसाद देत असते. फलनानंतर सिकाडाची मादी झाडाच्या कोवळ्या फांदीच्या सालींमध्ये पाचशे ते सहाशे अंडी महिन्याभरात घालते . सहा ते दहा आठवड्यांनी अंडी फुटून अळ्या बाहेर पडून जमिनीमध्ये १७ वर्षांसाठी शिरतात. नर व मादी फलनानंतर मरण पावतात.
१७ वर्षे संपल्याचे त्यांना कसे कळते हे अजून तरी गूढच आहे.
एक प्रश्न आहे. ही सारी माहिती आहे. त्याचे ज्ञान कधी व कसे होणार?
ईशवराच्या योजनेनुसार सजीवांचे अस्तित्व… स्थिती ...व लय हे गतिमान चक्र अव्याहतपणे चालूच राहते.
सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
Comments